झारीतील शुक्राचार्य

आज पुण्यनगरी ४ येथे झारीतील शुक्राचार्य पंथाच्या पर्यावरणी देवीचा श्री क्षेत्र रिकामटेकडी येथे मोठा उत्सव आहे तरी देवीच्या अतिप्रिय भक्तांनी संगणकावरून आपापसात नरेंद्र मोदी व भाजपमधील इतर नेते आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी हे कसे मूर्ख आहेत आणि ते सारखे कशा चुका करतात या पद्धतीचे संभाषण करून साजरा करावा अशी देवीच्या स्वयंघोषित पंड्यांची सूचना आहे. देवीच्या अतिप्रिय भक्तांची लक्षणे पुढीलप्रमाणे :


१. एखाद्या विषयात तज्ञ् असल्यामुळे आपण सगळ्या विषयात तज्ञ्  हा पूर्वग्रह लागतो 

२. सामाजिक कार्य या विषयात प्राविण्य, एखाद्या खाजगी धंद्याचे मालक किंवा हिंजवडीमधील एखाद्या हमाल पुरवणाऱ्या महाप्रचंड कंपनीमध्ये वरिष्ठ पद  लागते 

३. भयंकर प्रदूषण करणाऱ्या डिझेल या इंधनावर चालणारी भलीमोठी गाडी लागते

४. सोशल मीडिया वर झपाझप मोदी आणि सरकारविरोधी मते मांडण्याचे आणि ते पुढे ढकलण्याचे कसब अतिशय महत्वाचे आहे

५. वर्क फ्रॉम होम ही काम करण्याची एकमेव पद्धत असली पाहिजे 

६. टिम्बक्टू येथील सरकारने केलेली वाहतूक उपाययोजना ही जगात कशी सर्वोत्तम व पुण्यासाठी सर्वात योग्य हे कुठलाही अभ्यास न करता छातीठोकपणे सांगता आले पाहिजे, उदा: BRT 

७. आपली गल्ली व प्रभाग सोडून बाकी इतर ठिकाणी काय वाटेल ते झाले तरी आपल्याला काय फरक पडतो अशी मनोवृत्ती हवी 

८. इतर लोकांनी बस, मेट्रो वगैरे वापरल्यास रस्त्यावरची गर्दी  होऊन आपली मोठी गाडी भरधाव हाकता येईल असे सुखस्वप्न वातानुकूलित खोलीत सकाळी आठच्या वेळी साखरझोपेत असताना पडणे आवश्यक आहे 

९. घरची गरिबी लागते 

१०. वर्षातून किमान ४ ते ५ वेळा  आंतरराष्ट्रीय विमान प्रवास केला नसल्यास या देवीची भक्ती करता नाही 

११. नरेंद्र मोदींविषयी विशेष घृणा असावी लागते 

१२. अत्यंत अतार्किक गोष्टी कशा तर्कशुद्ध आहेत हे रोज ओरडून सांगण्याची कला महत्वाची आहे 

१३. आपण म्हणतो तेच बरोबर आणि बाकी सर्वांचे चूक अशी ठाम निष्ठा हवी

१४. आजची परिस्थिती आणि २५ वर्षानंतरची परिस्थिती तीच असणार आहे असा दृढविश्वास लागतो. आणि परिस्थिती खूप बदलली आहे हे २५ वर्षांनी लक्षात आल्यावर आपल्याकडे प्लॅनिंग कसे करता येत नाही याविषयी रुपालीमधे उहापोह करता यावा लागतो 


दुसरा काहीही पर्याय नसल्यामुळे उपजीविकेसाठी रोज धूळ, धूर आणि खड्डे यांचा सामना करत तासनतास दुचाकी, बस, सायकल वापरणाऱ्या लोकांनी या देवीची पूजा केल्यास तिचा कोप होऊन त्यांना रोजच्या प्रवासासाठी जास्त वेळ लागेल अशी व्यवस्था होते. तरी तुम्ही या प्रकारात बसत असलात तर उगाच वेळ वाया न घालवता पटकन वरच्या गटात जाता यावे या दृष्टीने प्रयत्न करावा. असे न केल्यास मोक्ष मिळणार नाही. 

Comments

Popular posts from this blog

Walking the Kasbah (Kasaba or कसबा)

The Moffett Field Museum

Is Dall.E Mini or Craiyon depending on Google Image Search to Draw?